BEST OFFERS

Tuesday, 31 October 2017

सहकलाकाराच्या भूमिकांना प्रतिष्ठा मिळवून देणारा चतुरस्त्र कलाकार : विजय चव्हाण !



पूर्वी नाटक-चित्रपटांमधून पुरुषांनी स्त्री-पार्टी भूमिका कराव्या लागणं ही काळाची गरज होती. सामाजिक स्थिती सुधारल्यावर स्त्रिया नाटक-चित्रपटात भूमिका करू लागल्या आणि पुरुषांनी स्त्रीवेष धारण करणं हे केवळ विनोद निर्मितीपुरतं उरलं. किंबहुना काळ असा आला की पुरुषांनी स्त्रीवेषातील भूमिका करणं कमीपणाचं लेखलं जाऊ लागलं. परंतु रंगभूमीवर आलेल्या 'मोरूची मावशी' या नाटकाने इतिहास बदलला. त्यातील मावशी ची भूमिका करणारे विजय चव्हाण यांनी वरील समज पुसून काढला. कुठल्याही प्रकारचा ओंगळपणा न करता या नाटकात स्त्रीपार्टी भूमिका करत त्यांनी प्रेक्षकांची वाहवाही मिळवली. स्पर्धात्मक एकांकिका आणि नाटकांतून अभिनय करत विजय चव्हाण यांनी 'टूर टूर' या नाटकातर्फे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. नंतरच्या मोरूची मावशी ने तर त्यांना प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनवले ते आजतागायत. त्यांनी ३००० हून अधिक या नाटकाचे प्रयोग केले यावरून त्यांच्यावरील प्रेक्षकांच्या प्रेमाची कल्पना येईल. या सुरुवातीच्या काळापासून ते अलीकडच्या 'श्रीमंत दामोदरपंत' नाटकांच्या दरम्यान त्यांनी अनेक नाटकांतून सुंदर-सुंदर भूमिका साकारल्या.
नाटकांबरोबरच विजय चव्हाण यांनी छोटा आणि मोठ्या पडद्यावर पण आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली. जत्रा, नाना मामा, झपाटलेला १ आणि २, पछाडलेला, अगं बाई अरेच्चा, जबरदस्त, सांगतो ऐका, जिगर, शुभ मंगल सावधान, नो प्रॉब्लेम, बलिदान, नाथा पुरे आता, चल लवकर, सावट, मुंबईचा डबेवाला सारख्या अडीचशेहून अधिक चित्रपटांमधून काम करत त्यांनी रसिकांचे मनोरंजन केले. उस्फुर्त विनोदासाठी प्रसिद्ध असलेल्या अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या विनोदवीर नायकांनंतर विजय चव्हाण या सहकलाकाराचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांच्यातील सळसळत्या ऊर्जेने इतर कलाकारांच्याही उत्साह वाढायचा. त्यांनी विनोदी भूमिकांबरोबरच गंभीर भूमिकांनाही योग्य न्याय दिला. 'गोल गोल डब्यातल्या', 'वन रूम किचन' आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हलाल' याची साक्ष देतात व त्यांच्या चतुरस्रपणावर मोहोर उमटवतात. महेश कोठारेंच्या 'शुभ मंगल सावधान' मधील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या करियरला कलाटणी मिळाली आणि सहकलाकारांच्या भूमिकांना महत्व प्राप्त करून दिले. महेश कोठारेंच्या नंतरच्या प्रत्येक चित्रपटाचा ते भाग राहिले.
प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या विजय चव्हाण या चतुरस्त्र कलाकाराने गेली चार दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय आणि त्यांची भूमिका असलेला एक नवीन सिनेमा येऊ घातलाय ज्याचं नाव आहे 'हुंटाश' ! 'मी आजतागायत अनेक विनोदी भूमिका केल्या आहेत परंतु 'हुंटाश' या चित्रपटातील भूमिका करताना एक वेगळ्या धाटणीची विनोदी भूमिका करण्याचा आनंद मिळाला. दिग्दर्शक तरुण असल्यामुळे नवनवीन विचारांची देवाण घेवाण झाली व भूमिका साकारताना फायदा झाला. अपर्णा प्रमोद आणि अवधूत नावलेकर नवीन सारख्या निर्मात्यांचं कौतुक करायला हवं कारण मराठी सिनेमाच्या प्रेमापोटी ते निर्मितीक्षेत्रात उतरत आहेत आणि आम्हा सर्व सिनियर कलाकारांची उत्तम काळजी घेतल्याबद्दल त्यांना सर्वांतर्फे धन्यवाद देतो. माझी ग्वाही आहे की 'हुंटाश' सर्वांचं भरपूर मनोरंजन करेल' विजय चव्हाण कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले.
निर्माते अपर्णा प्रमोद आणि अच्च्युत नावलेकर आणि दिग्दर्शक अंकुश ठाकूर यांचा धमाल विनोदी चित्रपट 'हुंटाश' १० नोव्हेंबर २०१७ ला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

Oxford Economics report: Airbnb delivered INR  113 billion to India’s GDP and supported 111,000 jobs in 2024

● Airbnb activity contributed INR 113 billion to India’s economy in 2024 . ● This activity supported approximately 111,000 jobs ...