औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बर्याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्यार्या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. परंतु भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमूर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले आणि १४ जानेवारी १७६१ ला पानिपत मध्ये तिसरे घनघोर युद्ध झाले ज्यात मराठ्यांचा पराभव झाला.
याच युद्धावर आधारित निर्माते श्री अजय प्रभाकर कांबळी एक चित्रपट बनवीत असून त्याचे नाव आहे 'पानिपत'. सखोल संशोधनाच्या आधारे चित्रपटाची कथा-पटकथा लिहिलीय श्री अभय प्रभाकर कांबळी यांनी आणि 'पानिपत' चे दिग्दर्शनही तेच करणार आहेत. महत्वाची गोष्ट अशी की या चित्रपटाद्वारे जेष्ठ संगीतकार श्रीधर फडके संगीत-दिग्दर्शनात पुनरागमन करीत आहेत. बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांचे पुत्र असल्यामुळे संगीत रक्तातच आहे. संगीतातील कुठलंही शास्त्रोक्त प्रशिक्षण न घेताही ते उत्तम गायक आणि संगीतकारही आहेत. 'लक्ष्मीची पाऊले', 'पुत्रवती', 'विश्वविनायक', 'घराबाहेर', 'हृदयस्पर्शी' सारख्या अनेक मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. मध्यंतरीच्या काळात काही कारणास्तव ते चित्रपटसंगीतापासून लांब राहिले होते. परंतु आता 'पानिपत' या भव्य-दिव्य चित्रपटाला ते संगीतबद्ध करीत आहेत. चित्रपटातील तीन गाण्यांचं ध्वनिमुद्रण झालंही असून त्यातील दोन गाण्यांना सुखविंदर सिंग आणि रिचा शर्मा या बॉलिवूडमधील प्रतिष्ठित गायकांचा आवाज लाभला आहे. सुखविंदर सिंग यांनी डॉ शिरीष गोपाळ देशपांडे यांनी लिहिलेल्या 'सांडले मराठी रक्त, राखण्या तख्त...' गाण्याच्या रेकॉर्डिंग नंतर श्रीधर फडके यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
श्री वेंकटेश्वरा मुव्हीज् इंटरनॅशनल ची निर्मिती असलेला व अभय कांबळी दिग्दर्शित 'पानिपत', ज्याद्वारे संगीतकार श्रीधर फडके यांचे चित्रपट संगीतात पुनरागमन होत आहे, चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच प्रारंभ होत असून तो पुढच्या वर्षी दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.