मी सिंधू ताई सपकाळ, तू ही रे असे अनेक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडितला २०१८ च उत्तरार्ध वर्ष खूप अनुकूल ठरलं आहे. २०१८ मध्ये जणू तिच्यावर हिट चित्रपटांचा वर्षाव झाला आहे. त्याचं कारण म्हणजे नुकतेच तेजस्विनी चे दोन चित्रपट प्रदर्शित झालेत. २०१७ च्या अखेरीस तेजस्विनी चा 'देवा' हा चित्रपट रिलीस झाला तर २०१८ च्या सुरुवातीस संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. मुख्य म्हणजे ह्या दोन्ही चित्रपटांनी थिएटर हाऊसफुल केलं. प्रेक्षकांनी ह्या दोन्ही चित्रपटाला छान प्रतिसाद दिला.
देवा मध्ये तेजस्विनी लेखिकेच्या भूमिकेतून दिसली. ह्या चित्रपटात पहिल्यांदाच तिने अंकुश चौधरी सोबत काम केलं आहे. चित्रपटात तिने केलेल्या अनोख्या फॅशन बद्दल देखील प्रेक्षकान मध्ये चर्चा रंगली तर 'ये रे ये रे पैसा' मध्ये तेजस्विनी बबली ही भूमिका साकारताना दिसली. सिद्धार्थ जाधव आणि उमेश कामत सोबत तेजस्विनी देखील भाव खाऊन गेली. दिग्दर्शक संजय जाधव ह्यांचासोबत तेजस्विनीचा हा दुसरा सुपरहिट चित्रपट. ह्या दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. 'देवा' आणि 'ये रे ये रे पैसा' असे दोन सुपरहिट चित्रपट देऊन तेजस्विनी भलतीच खुष झाली आहे.
दोन सुपरहिट चित्रपटांचा हिस्सा झाल्यावर तुझा अनुभव कसा होता? ह्याबाबत तिला विचारल्यास ती म्हणाली: "दोन्ही चित्रपट माझ्या साठी महत्वाचे होते आणि दोन्ही चित्रपटांचं चित्रीकरण करत असताना मला फार मज्जा आली. सेन्सॉर बोर्ड च्या नियंमांमुळे देवा 22 डिसेंबर ला प्रदर्शित करण्यात आला आणि येरे येरे पैसा ५ जानेवारी ला प्रदर्शित केला. दोन्ही चित्रपटांच्या तारखान मध्ये काही दिवसांचाच वेळ असल्यामुळे माझी धावपळ होत होती पण दोन्ही चित्रपटांची टीम सपोर्टटिंग होती म्हणून मला बॅलन्स करता आलं. तसंच 'येरे येरे पैसा' मध्ये बरेच कलाकार असल्यामुळे प्रमोशन करायला ते सोप्प जात होतं. मी जेव्हा एखादा चित्रपट करते किंवा एखादं काम करते, त्याचा पुढे काय परिणाम होईल तो कितीपट चालेल हे गृहीत धरून त्या चित्रपटासाठी काम करत नाही. हो! पण निश्चितपणे अपेक्षा असतात. हा चित्रपट कमी धंदा करेल म्हणून मी माझं काम १००% देणार नाही असं गृहीत न धरता कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये मी त्या चित्रपटाचा १००% भाग होण्याचा प्रयत्न करत असते कारण कुठलीही कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते."