मूकबधिर असणे हे सामाजिक दृष्ट्या कमीपणाचे आहे असं मानलं जातं. अपंग व्यक्तींना समाजात फार हिनतेने वागवले जाते. जोश फाउंडेशन ही संस्था अशाच अपंग व्यक्तींना प्रेरित करून स्वबळावर जगणारे नागरिक घडवत आहे. मराठी इंडस्ट्रीतले गाजलेले नाव सई ताम्हणकर ह्या फौंडेशनशी जोडले गेले आहे. जोश संस्थेचा मूकबधिर मुलांना स्वबळावर उभे करण्याचा उपक्रम सईला फारच आवडला आणि त्यानंतर सई देखील या कामात सहभागी झाली.
यश हे केवळ पैशांतून मिळत नाही परंतु समाजाच्या दिशेने उचललेली एक जबाबदारी असते. सई गेलं वर्षभर अशा विविध समाजकार्याचा महत्वाचा भाग बनली आहे. मग ते आमिर सोबत पाणी फौंडेशनच काम असो वा जोश फौंडेशनचा आगळावेगळा उपक्रम असो.
जोश संस्थेतील मूकबधिर विद्यार्थिनी सारा थडानी पटेल ही सध्या हेअर आर्टिस्ट व मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत आहे . तिने फॅशन चित्रपट आणि लॅक्मे फॅशन विक साठी मेकअप आर्टिस्ट म्हणून केलं आहे. तिच्या ह्या प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या यशावर जोश फौंडेशनने एक लघूपट बनवला आहे, ज्याचं नाव आहे - Shining Through Stars! हा लघुपट ४ डिसेंबर ला सईच्या उपस्थितीत मुंबईतील मिठीबाई कॉलेज येथे दाखवला गेला. या लघुपटात मेकअप आर्टिस्ट 'सारा थडानी' कडून सईने स्वतःचा मेकअप करून घेतला आहे.
हा अनुभव सांगताना सई ह्याबाबत म्हणते, "सारा ज्या आत्मविश्वाने कामाला सुरुवात करते, तो पाहून तुम्हाला तिच्या कामाबद्दल काहीही शंका येत नाही. ती तिचं काम खूप मनापासून आणि कल्पकतेने करते. तिचं काम पाहून तिच्या मूकबधिर असण्यामागच्या तुमच्या ज्या काही शंकाकुशंका असतील त्या अगदी झटक्यात दूर होतील."
ह्या फौंडेशनसोबत काम करताना सईला खूप काही नवीन पहायला मिळालं, त्याबाबत सई म्हणते, "समाजात मूकबधिर मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूपच दयनीय आहे. आपण नेहमी ह्यांना सहानुभूतीने पाहतो आणि त्यांना आपल्या सहानुभूतीची गरज आहे असं समजतो. पण हे चुकीचं आहे. खरंतर ही मुलं खूप स्ट्रॉंग आणि प्रचंड हुशार असतात. खूप मेहनतीने त्यांना गोष्टी शिकाव्या लागतात पण ते त्या आपल्यापेक्षा जास्त जाणीवपूर्वक शिकतात. ही मुलं खूप स्वावलंबी असतात. समाजाने त्यांना सहजतेने वागवलं पाहिजे. माणसाची ओळख त्यांच्या कामातून असते. आणि ह्या मूकबधिर मुलांचं हे काम नक्कीच त्यांची स्वतंत्र ओळख करून देतं."
गेली अनेक वर्ष जोश फौंडेशन मुकबधिर लोकांसाठी काम करत आहे. फौंडेशनने अनेक जणांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्यास शिकवले आहे. यातील काही विद्यार्थी इंजिनिर, फोटोग्राफर, इंटिरियर डीजाईनर तर काही ग्राफिक डीजाईनर होऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. अपंगत्व हे शारीरिक नव्हे तर धडधाकट असलेल्या सामाजिक मानसिकतेत असते, आणि अपंग मुलं ही त्या सगळ्या गोष्टी करू शकतात ज्या नॉर्मल मूल करु शकतात, हे ह्यातून स्पष्ट होते.