भारताच्या मानुषी छिल्लर ने नुकताच 'मिस वर्ल्ड' 'किताब जिंकला आणि देशवासीयांची मान अभिमानाने वर केली. सतरा वर्षांपूर्वी 'मिस वर्ल्ड' चा मुकुट प्रियांका चोप्राने भारतात आणला होता. त्यानंतर प्रियंकाने अभिनयक्षेत्रात मेहनतीने आपले वेगळे स्थान निर्माण केले व हॉलिवूडमध्ये यशस्वी होत बॉलिवूडची ती पहिली इंटरनॅशनल स्टार बनली. सौंदर्यस्पर्धा जिंकल्यावर बऱ्याच विजेत्या सुंदरींचा पुढचा स्टॉप असतो तो म्हणजे चित्रपटक्षेत्र. आणि त्यात वावगं काहीच नाही कारण चित्रपट आणि सौंदर्य हातात हात घालून चालत असतात. अशीच एक सौंदर्यस्पर्धेची विजेती आपल्या मातृभाषेतील चित्रपटक्षेत्रात पाऊल टाकतेय. 'मिस अर्थ इंडिया' चा मुकुट संपादन केलेली हेमल इंगळे मराठी चित्रपट 'आस' मधून मराठी चित्रसृष्टीत पदार्पण करीत आहे.
कोल्हापुरात वाढलेल्या या मराठमोळ्या मुलीने, हेमल इंगळे ने, पर्यावरण संवर्धनावर आधारित असलेल्या सौंदर्यस्पर्धेत 'मिस अर्थ इंडिया' हा प्रतिष्ठित 'किताब मिळवला. दिल्लीत रंगलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातून ५ तर देशभरातून ३५ मुलींनी भाग घेतला होता आणि अंतिम फेरीत हेमल इंगळे भारताची प्रतिनिधी म्हणून अव्वल ठरली होती. त्यानंतर हेमलने सातासमुद्रापार अमेरिकेत होणाऱ्या 'मिस अर्थ वर्ल्ड' या जागतिक सौंदर्यस्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
तर, हेमल इंगळे ही सौंदर्यवती आता आपल्या मातृभाषेतील चित्रपटक्षेत्रात पदार्पण करीत आहे. कथा-पटकथा-संवाद लेखक तसेच निर्माते आणि दिग्दर्शक मनोज विशे यांच्या 'आस' या चित्रपटात ती मध्यवर्ती भूमिकेत आहे. 'पहिल्यांदाच चित्रपटात भूमिका करत असूनही तिने नवखेपणाचा लवलेशही दर्शविला नाही. खरोखरच हेमल इंगळे ही 'ब्युटी विथ ब्रेन्स' आहे. तिचा अभिनय बघून ती लवकरच आघाडीची अभिनेत्री होणार यात शंकाच नाही' असं 'आस' चित्रपटाचे निर्माते- दिग्दर्शक मनोज विशे यांनी सांगितलं.
स्वरनाद क्रिएशन ची प्रस्तुती असलेला मनोज विशे दिग्दर्शित 'आस' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.