इंद्रपुरीच्या मेनका आणि रंभा, तुजपुढे काय त्यांचा टेंभा चंद्रिके काय त्यांचा टेंभा... चित्रपटाची कथा – पटकथा आणिकलाकारांच्या अभिनयाबरोबरच जेव्हा दर्जेदार संगीताचा साज एखाद्या चित्रपटाला चढतो तेव्हा त्या चित्रपटाची शानकाही औरच असते. अशाच दर्जेदार गीतांनी नटलेला चित्रपट म्हणजे “छंद प्रितीचा”... लावण्या, लोकगीतं, सवाल – जवाब, भावगीतं, भक्तीगीतं अशा सगळ्याच काव्य प्रकारांत तरबेज शाहीराच्या लेखणीची जादू “छंद प्रितीचा” चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
आपल्या कलेवरील प्रेमाखातर वडिलोपार्जित संपत्तीची आशा सोडून आपले आयुष्य कलेला वाहून घेणाऱ्या शाहीराची ही कथा... ज्यात त्याच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतांवर तितक्याच ताकदीचं नृत्य करणारी चंद्रा त्याला भेटते आणि दोन कलाप्रेमींमध्ये जडलेल्या प्रितीला एक वेगळं वळण लागतं... या एकंदर प्रवासात एकापेक्षा एक लोकगीतांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.
आपल्या कलेचा छंद जडलेल्या शाहीराच्या या कथेतून संगीताची लयलूट होणार आहे. जावेद अली आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरांनी सजलेलं “आलं आभाळ भरूनं” हे प्रेमगीत तर “निस्ती दारावर टिचकी मारा”, “वाजो पहाटेचे पाच”, “सत्य सांगते” या बेला शेंडे यांच्या आवाजातील फटाकेबाज लावण्या त्याचबरोबर बेला शेंडें – वैशाली सामंत यांच्यात रंगलेला सवाल – जवाब आणि आदर्श शिंदे यांच्या आवाजातील “कोसळली ती वीज” हे गीत आणि आदर्श शिंदे च्या आवाजाने नटलेली “शाहीरी लावणी” अशा कैक लोकगीतांनी नटलेला चित्रपट “छंद प्रितीचा”.... या चित्रपटात एकंदर आठ गाणी आहेत. एन. रेळेकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या या गीतांना प्रविण कुवर यांचे सूर लाभले आहेत. एन. रेळेकर यांनी गीतलेखनाबरोबरच कथा – पटकथा – संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा ही सांभाळली.
प्रेमला पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती चंद्रकांत जाधव यांनी केली असून या चित्रपटात कलाप्रेमी शाहीराच्या भूमिकेत हर्ष कुलकर्णी दिसणार आहेत तर नृत्यनिपून चंद्राची भूमिका साकारली आहे सुवर्णा काळे हिने...तर ज्याच्या ढोलकीच्या तालावर हा डोलारा उभा राहतो त्या राजारामाच्या भूमिकेत सुबोध भावे आहेत.
‘छंद प्रितीचा’ या चित्रपटाच्यानिमित्ताने पुन्हा एकदा सोंगाड्याची जादू प्रेक्षकांवर होणार आहे ज्याच्या भूमिकेत विकास समुद्रेंना पाहता येणार आहे. त्याचबरोबर शरद पोंक्षे, गणेश यादव, सुहासिनी देशपांडे, अभिषेक कुलकर्णी आणि विशाल कुलथे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
तेव्हा दर्जेदार संगीताचा आस्वाद नक्की घ्या तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येत्या 10 नोव्हेंबरला...