मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचे ठसे उमटवत कधी सुजाता तर कधी देवकीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेत्री शिल्पा तुळसकर. २२ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या 'अनान' चित्रपटातून त्यांचं एक नवीन रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे.
देवकी, डोंबिवली फास्ट, कालचक्र आणि आता बॉईज यांसारखे चित्रपट असो, लेडीज स्पेशल, दिल मिल गए, देवों के देव- महादेव यांसारख्या मालिका असो वा जावई माझा भला, लहानपण देगा देवा यांसारखी नाटके असोत सिनेमा, मालिका आणि नाटक या तीनही क्षेत्रात आपल्या उत्तोमोत्तम अभिनयाने नेहमीच स्वतःला सिद्ध करत, आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय मिळवून देण्याचं काम शिल्पा तुळसकर यांनी वेळोवेळी केलेले आहे. आता 'अनान' या आगामी मराठी चित्रपटातून ६४ कलांचं महत्त्व जगाला पटवून देणाऱ्या या भारत देशातील संगीताची संस्कृती पिढ्यांपिढ्या पुढे सुरु ठेवणाऱ्या पंडीत वसुंधरा या भूमिकेत त्या आढळून येणार आहेत.
इस्लामी संस्कृतीकडून भारतीय संगीतास मिळालेल्या सुगम संगीताची देणगी म्हणजेच 'गझल'... आपलं संपूर्ण आयुष्य कलेला वाहून देणाऱ्या गझल गायिकेची भूमिका शिल्पा तुळसकर या चित्रपटात साकारत आहेत. त्यांच्या अभिनयाच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत प्रथमच त्या अशा भूमिकेत दिसणार आहेत. अस्खलित उर्दू भाषेचा वापर, घरंदाज गायिकेची शैली आणि तिच्यात लपलेली एक प्रेमळ आई आणि अबोल प्रेमिका यांचं मिश्रण असलेली ही वसुंधरा पाहण्यास एक वेगळीच उत्कंठता निर्माण झालेली आहे.
'रोहन थिएटर्स' च्या रौनक भाटीया आणि हेमंत भाटीया यांनी 'अनान' या चित्रपटाची निर्मिती केलेली असून कथा आणि क्रिएटीव्ह डायरेक्शन हेमंत भाटिया यांचं आहे. दिग्दर्शन राजेश कुष्टे यांनी केलेलं आहे तर पटकथा–संवाद राजेश कुष्टे आणि मुकेश जाधव यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचं संकलन सेजल पेंटर यांनी केलं असून छायाचित्रण राज कडूर यांनी केलं आहे.
येत्या २२ सप्टेंबर ला 'अनान' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन तो बघायला विसरू नका.