सिनेरसिकांसाठी उत्तमोत्तम चित्रपटांची वर्षभर मेजवानी
गेली 50 वर्ष महाराष्ट्रातील सिने रसिकांना चित्रपट माध्यमाचे अभ्यासपूर्ण रसग्रहण करायला उद्युक्त करणारी, समर्पित भावनेने कार्य करणारी एक अग्रगण्य संस्था म्हणजे प्रभात चित्र मंडळ. प्रभात चित्र मंडळ येत्या 5 जुलै 2017 रोजी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्या निमित्ताने विविध विशेष महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या 5 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजता प्रभात स्थापना-वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन प्रभादेवी येथील रवीन्द्र मिनी थिएटर येथे ‘आय डॅनियल ब्लॅक’ या जागतिक पातळीवर नावाजलेल्या दिग्दर्शक केन लॉच यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाने शुभारंभ होणार आहे.
5 जुलै 1968 रोजी सत्यजित रे यांच्या चिरीयाखाना या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाने प्रभात चित्र मंडळाची स्थापना झाली होती. जगातील सर्वोत्तम चित्रपट मुंबईतील मराठी भाषिक सिनेरसिकांपर्यंत पोहोचावेत या हेतुने काही सिनेपत्रकारांच्या साहाय्याने व्ही. पी. साठे यांनी प्रभात चित्र मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. विविध देशातील सकस चित्रपटांचा आस्वाद घेण्यासोबत अभ्यास म्हणून ते पाहिले जावेत या उद्देशाला अनुसरून आजही प्रभात चित्र मंडळाची घोडदौड अविरत सुरू आहे.
या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध ठिकाणी चित्रपट रसास्वाद शिबिरे, मराठी चित्रपट महोत्सव, ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा महोत्सव,‘चित्रभारती’-भारतीय चित्रपटांचा महोत्सव, मान्यवरांच्या पसंतीच्या चित्रपटांचे प्रदर्शन, अभ्यास शिबिरे, चर्चासत्र आणि वास्तव रूपवाणी विशेषंकाचे प्रकाशन त्याच बरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रभात चित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक शाम बेनेगल, गोविंद निहलानी, नीना कुलकर्णी, रवी जाधव, दिलीप करंबेळकर, मनमोहन शेट्टी आदी मान्यवरांची एक स्वागत समिती गठीत करण्यात आली आहे. या सर्व दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली प्रभात चित्र मंडळाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभात चित्र मंडळाचे सचिव प्रा. संतोष पाठारे यांनी दिली.