जेव्हा विद्या पटवर्धन यांनी बालमोहन शाळेतील सहावीच्या वर्गात एक प्रश्न विचारला 'कुणाकुणाला नाटकात काम करायचे आहे?' तेव्हा एका विद्यार्थिनीने कुतूहलापोटी हात वर केला. नाटक कशाशी खातात याची तिला यत्कंचीतही कल्पना नव्हती. परंतु त्यावेळी वर केलेले बोट तिला, जिला तोपर्यंत डॉक्टर बनण्याची इच्छा होती, अभिनयक्षेत्रात घेऊन आले. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी तिने रंगभूमीवर पाऊल टाकले व मोठा कॅमेरा फेस करत टी व्ही सिरिअल्स मधेसुद्धा भूमिका करायला सुरुवात केली. तेव्हाची लहानशी मुलगी, नम्रता कदम आजही, इतक्या वर्षांनंतरही तिच्या यशाचं श्रेय विद्याताईंना द्यायला विसरत नाही.
मूळची मुंबईचीच असल्याकारणाने बाहेरून येऊन स्ट्रगल केल्याच्या हृदयद्रावक कथा तिच्याकडे नाहीत. खरंतर मुंबईबाहेरून मनोरंजनविश्वात करिअर करण्यासाठी येणाऱ्यांना सगळे सोपे असते. त्यांच्या ध्येयासाठी ते कुठलेही कष्ट करायला तयार असतात कारण तेच एकमेव उपजीविकेचे माध्यम असते. उलटपक्षी मुंबईकर निवारा आणि पोटाची चिंता नसल्यामुळे तेवढ्या पोटतिडकीने या विश्वाला भिडत नाहीत. नम्रताला जरी ह्या विश्वात बोट धरून आणले असले तरी इतकी वर्ष तग धरून राहणं तीला नक्कीच आव्हानात्मक ठरलं असणार. लहानपणीच नाटक, सिनेमा, सिरिअल्स मध्ये काम करण्याची संधी मिळाली व तिनेही त्या संधीचं सोनं केलं. सई परांजपेंच्या बालदूत व बेहना या हिंदी मालिकेत आणि जब्बार पटेलच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्ये काम केलं. तिच्या टीन -एजमध्ये त्याच सुमारास व्यावसायिक नाटकंदेखील केली. टेक-इट-इझी, भूल भुलैया, मी.अँड मिसेस सारख्या नाटकात तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. सोळाव्या वर्षीच ती आभाळमायात श्रेयस तळपदेबरोबर प्रेमाच्या त्रिकोणात दिसली. त्यानंतर उत्तरोत्तर प्रगती करत कळत-नकळत, अग्निशिखा , लक्ष्मणरेषा, पिंजरा, बे दुणे दहा, कस्तुरी, पुढचं पाऊल अशा मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. हल्लीच संपलेल्या तिच्या पसंत आहे मुलगी सिरीयलमधील तिच्या कुमुद वहिनी च्या भूमिकेचे खूप कौतुक झाले.
नम्रता मराठीप्रमाणे हिंदीतही तेवढ्याच सहजतेने वावरते. तिची मुख्य भूमिका असलेली 'आ मुस्कुरा' ह्या हिंदी चित्रपटाचे ऑस्ट्रेलियात मेलबर्न इंट. फिल्म फेस्टिव्हलमधे अनावरण झाले. तिचे हिंदी नाटक मिताली जोशी दिग्दर्शित 'कनुप्रिया' प्रेक्षकांची वाहवा मिळवतेय. ही पोरगी कुणाची (२००६) ह्या चित्रपटाद्वारे तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं व त्यानंतर प्यारवाली लवस्टोरी व हल्लीच गाजलेला व्हेंटिलेटर केला. व्हेंटिलेटर मधे तीने सहाय्यक दिग्दर्शक व कास्टिंग डिटेक्टर रोहन मापुस्कर बरोबर असोसिएट कास्टिंग डिरेक्टरची जबाबदारीही पेलली. 'मी पहिल्यांदाच
बिहाइंड-द-कॅमेरा काम केलं आणि त्यामुळे सिनेमाच्या सर्व अंगाचं नॉलेज वाढलं. आणि ह्याचा मला भविष्यात नक्कीच फायदा होईल', असं नम्रता सांगते. सध्याच तिचं नवं-कोरं नाटक 'एक शून्य तीन' चा शुभारंभ झाला आसून तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.
ही मुबईची मुलगी चांगुलपणावर विश्वास ठेवते व माणसं जोडण्यावर भर देते. गंमत म्हणजे ती पाण्याला प्रचंड घाबरते पण समुद्राबरोबर गट्टी करते. 'समुद्र मला जगण्याची खूप भरारी देतो' नम्रता कदम प्रांजळपणे कबुली देते आणि ह्या तडफदार गुणी तरुण अभिनेत्रीला यंदा कर्तव्य आहे!